संजय राऊतांची दिवाळी कारागृहातच; पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ऑक्टोबर । पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. आता या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढल्याने त्यांना कारागृहातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करून काही भूखंड खासगी विकासकाला विकला.

म्हाडा व भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसत प्रवीण राऊत यांनी भूखंडाचे अनेक भाग खासगी विकासकांना हस्तांतरित केले. तर स्वतःचे २५ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

नेमका ईडीचा दावा काय?

दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून १,०३९.७९ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून १०० कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. २०१० साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी ८३ लाख रुपये जमा केले होते.

एकनाथ खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा-

दरम्यान, सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची संजय राऊत यांच्यासोबत कोर्टासमोर भेट झाली. या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी केली. “राऊत मला म्हटले लवकरच बाहेर येणार आहे. सर्व काही ओके आहे, तुम्ही सगळी चिंता करु नका, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *