महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ ऑक्टोबर । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक तसेच शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ठाकरे व भाजपमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या शुभेच्छांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरुन अमित शहांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात नार्वेकर यांनी म्हटले आहे की, अमित शाहजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वशक्तिमान देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो.
मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव तसेच उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. सध्या शिवसेना व भाजपमधून विस्तवही जात नसताना मिलिंद नार्वेकरांनी हे ट्विट का केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ट्विटच्या माध्यमातून भाजपने आता चर्चेची दारे शिवसेनेसाठी उघडी करावीत, असे अप्रत्यक्ष आवाहन तर मिलिंद नार्वेकर करत नाहीये ना? ही नवीन राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, दुसरीकडे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
ठाकरे-शहांमध्ये वाद
2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे व अमित शहांमध्ये एकमेकांना दिलेल्या वचनावरुन जोरदार वाद निर्माण झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला द्यायचे, किती काळासाठी मुख्यमंत्रीपदाची वाटणी करायची? या दोन प्रश्नांवरून दोन्ही नेत्यांनी परस्परविरोधी दावे केले आहेत. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे, हे अमित शहांनी मान्य केले होते. मात्र, नंतर हे वचन पाळले नाही, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर, अमित शहा म्हणाले होते की, असे कोणतेही आश्वसासन ठाकरेंना बैठकीत दिले नव्हते. केवळ मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी भाजपसोबत युती तोडली. तेव्हापासून हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहे.
शहांचे आव्हान
शिवसेनेसाठी मुंबई पालिका म्हणजे जीव की प्राण. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा करत ठाकरेंना आव्हान दिले. भाजपशी गद्दारी करणाऱ्या ठाकरेंना जमीन दाखवा, असे आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तर, उद्धव ठाकरेंनीही त्यास तोडीस तोड प्रत्युत्तर देत भाजपला आस्मान दाखवू, असे म्हटले होते. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांमधील वाद एवढा चिघळलेला असताना मिलिंद नार्वेकरांच्या वाढदिवसाबद्दलच्या शुभेच्छांमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.