![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ ऑक्टोबर । धनत्रयोदशीसह आजपासून दिवाळीचा सण सुरू झाला आहे. कोविड संसर्गानंतर पहिल्यांदाच लोक दिवाळी कुठल्याही निर्बंधांशिवाय साजरी करण्यासाठी सज्ज आहेत. धनत्रयोदशीच्या काळात सोने खरेदी करण्याची आपल्या देशात मोठी परंपरा आहे. अशा स्थितीत यंदाही लोकांच्या नजरा सोन्याच्या किमतीकडे लागल्या आहेत.
तसेच परंपरेनुसार ग्राहक सकाळपासूनच सोने खरेदीला पोहोचले आहेत. धनत्रयोदशीला सोन खरेदी केलं तर बरकत राहते ही धारणा डोळ्यासमोर ठेवून मुहूर्त साधण्यासाठी सुवर्णनगरी म्हणून ओळख जाणाऱ्या जळगावतही नागरिकांनी सराफा दुकानात गर्दी केल्याच दिसत आहे.
यंदा जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान आजच्या सोन्याच्या दरांबाबत बोलायचे तर आज हे दर ५१ हजार रुपये प्रति ग्रॅम इतके कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आज सोने खरेदीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी याच दिवशी सोन्याचे भाव प्रति तोळा ५३ हजार रुपये इतके होते, मात्र यंदा तब्बल दोन ते अडीच हजार रुपये भाव कमी होऊन ५१ हजार प्रति तोळा झाल्यामुळे नागरिकांनी सोने खरेदीसाठी जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी केली आहे. सुवर्णनगरीतील दुकानांमध्ये अक्षरशा नागरिकांची सोने खरेदीसाठी जत्रा भरल्याच चित्र पाहिलं जाऊ शकतं.
देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने सोन्याची विक्री होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने घसरत आहेत. अशा स्थितीत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तसेच यंदा धनत्रयोदशी दिवाळीला बंपर खरेदी होऊ शकते असा विश्वासही व्यापाऱ्यांचा आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार सध्या २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,०६२ रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर यावर्षी १८ एप्रिल रोजी सोन्याने ५३,६०३ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. म्हणजेच सध्याच्या विक्रमी उच्चांकावरून सोने ३५४१ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
चांदीच्या दरात जोरदार घसरण
IBJA नुसार १ किलो चांदीची किंमत विक्रमी उच्चांकावरून १५,३३५ रुपयांनी घसरली असून यंदा ८ मार्च रोजी चांदी ७०,८९० रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. सध्या चांदीचा भाव ५५,५५५ रुपयांवर आला आहे. म्हणजेच चांदी विक्रमी उच्चांकावरून १५,३३५ रुपयांनी स्वस्त झाली आहे.