महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ ऑक्टोबर । दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांनी रविवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली. रांगोळी, पणत्या, झेंडू-शेवंतीसह अनेक प्रकारची फुले, पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी बघायला मिळाली. बाजारपेठांबरोबरच आपापल्या गावाला निघालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानके गजबजली होती.
शहरात गेल्या दहा दिवसांपासून रोज संध्याकाळी हजेरी लावणाऱ्या पावसामुळे अनेकांना दिवाळीची खरेदी करता आली नव्हती. धनत्रयोदशीला सोनेखरेदीचा मुहूर्त अनेकांनी साधला; पण फुले, पूजासाहित्य, रेडिमेड फराळासह कपडे खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी केली. दुपारी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच असल्याने बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली होती. संध्याकाळी साडेसहानंतर मात्र दुकाने ग्राहकांच्या गर्दीने पुन्हा गजबजली
यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळे खरेदीसाठी स्वतंत्र दिवस मिळणार नसल्याने रविवारी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, महात्मा फुले मंडई परिसर, रविवार पेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. झेंडू, शेवंती, गुलबक्षी, मोगरा अशा विविध फुलांनी बहरलेली मंडई, मार्केट यार्ड बघतानाही प्रसन्न वाटत होते. यंदा पावसाचा फटका बसल्याने फुलांचे प्रमाण कमी होते आणि चढ्या दराने विक्री सुरू होती. लक्ष्मीपूजनासाठी ठिकठिकाणी झेंडूच्या फुलांचे तोरण, लक्ष्मीची मूर्ती, केरसुणी, लाह्या बत्तासे आणि इतर पूजा साहित्याचे स्टॉल लागले होते. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिक मोकळेपणाने रस्त्यावर फिरताना दिसले. मध्यवर्ती पुण्याबरोबरच उपनगरांमधील बाजारपेठेमध्ये गर्दी बघायला मिळाली.