महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । मराठवाड्यात अद्याप परतीचा पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे जुन्या गहू, ज्वारी, तांदळाच्या दरात क्विंटलामागे ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही दरवाढ मागील आठ दिवसांत झाली असून रब्बी गहू, ज्वारीची पेरणी लांबली आहे. तांदळाच्या काढणीलाही यंदा उशीर झाला आहे. त्यामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. पाऊस काही दिवस सुरू राहिल्यास पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. नांदेड जिल्ह्यात ३ लाख ५८ हजार ७३१ हेक्टरवरील पिके वाहून गेली. सततच्या पावसामुळे पिकांची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. त्यातच कसेबसे आलेले पीक काढणीला आले असताना पुन्हा पाऊस झाल्याने पिकांची नासाडी झाली. विजयादशमीपासून नांदेड जिल्ह्यात रोज मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस हाेत आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचत असल्याने सोयाबीन काढणीला अडथळा निर्माण होत आहे. बहुतांश ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत. रान रिकामे झाले नसल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारीची पेरणी लांबली आहे.
असे आहेत दर.. : गावरान गहू पूर्वी २४०० रुपये क्विंटल होता. त्यात ३०० रुपयांनी वाढ झाली असून आता २७०० रुपये क्विंटल दर अाहेत. मध्य प्रदेशातील गहू पूर्वी ३००० रुपये क्विंटल होता आता ताे ३२०० रुपये क्विंटल, तांदूळ पूर्वी ३४०० रुपये क्विंटल हाेता आता ३८०० रुपये क्विंटल, ज्वारी ३००० रुपये क्विंटल होता आता ३५०० रुपये क्विंटल झाला आहे.