महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थाही काबीज केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत आहेत,’ असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली. सातारा येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, नरेश देसाई, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी झाली. ही निवडणूक पक्षाच्या घटनेनुसार झाली. आता मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यांच्या माध्यमातून पक्षाला चांगले दिवस येतील. राहुल गांधी यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू आहे. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ही यात्रा येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकवण्याचे काम राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा करेल. त्याचबरोबर काँग्रेसमधून जे बाहेर गेलेत, त्यांना परत कसे आणता येईल, हेही पाहिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना चव्हाण म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे की नाही, असा प्रश्न आहे. कारण, पंतप्रधानांनाच अशा संस्थांच्या नेमणुकीचे अधिकार आहेत.