महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । विश्वाला श्रद्धा आणि सबुरीबरोबरच सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या ऐश्वर्यसंपन्न धनलक्ष्मीचे पूजन सोमवारी सीईओ भाग्यश्री बानायत आणि त्यांचे पती प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त संजय धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी साईबाबांना सुमारे साडेतीन कोटींची आभूषणे घालण्यात आली होती. त्यात हिरेजडित रत्नांचा मुकुट व चांदीच्या शालीचाही समावेश होता.
विशेष म्हणजेच यंदा साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाचे १०० वे वर्ष आहे. साई मंदिर व परिसर रोषणाई व विविधरंगी फुलांच्या सजावटीने फुलून दिसत होते. द्वारकामाई आणि साईबाबांच्या लेंडीबागेत मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला. सोमवारी सायंकाळी ५ वाजता साईबाबांचे लक्ष्मीपूजन करण्यात आले. दीपावलीचे चारही दिवस सुगंधी उटणे लावून साईमूर्तीस मंगलस्नान घालण्यात येते. साईंना नैवेद्यात लाडू,चकली,चिवडा, करंजी असा फराळ होता. नवीन वस्त्र परिधान करून साईबाबांना अलंकार चढवण्यात आले.
१९२२ पासूनची लक्ष्मीपूजनाची परंपरा; हिरेजडीत रत्नमुकूट, सुवर्णालंकारांसह साईबाबांच्या अंगावर चांदीची शाल
१०० वर्षांची परंपरा साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाला १०० वर्षांची परंपरा आहे. १९२२ मध्ये साई संस्थानच्या निर्मितीनंतर लक्ष्मीपूजनाची सुरुवात झाली. साईबाबांच्या लक्ष्मीपूजनानंतर मंदिर परिसरातील लेंडीबागेत भाविक दिवे लावून दीपोत्सव साजरे करतात. कोरोनाकाळात मात्र दीपोत्सव झाला नव्हता.
असे झाले लक्ष्मीपूजन सायंकाळी ५ वाजता समाधी चौथऱ्यावर रोषणाई केलेला चौरंग, त्यावर नक्षीदार सुवर्णकलश, त्यात पारंपरिक चांदीराम नाणी, चांदीच्या कमळात उभी असलेली लक्ष्मीची व साईबाबांची मूर्ती मांडून पूजा करण्यात आली. तत्पूर्वी साई समाधी मंदिराच्या तळघरातील धनाचे पूजन करण्यात आले.
अंबानींकडून दर्शन, दीड कोटीची देणगी उद्योगपती अनंत अंबानी यांनी दीपावलीनिमित्त शिर्डीत साईसमाधीचे दर्शन घेतले. साईबाबांना सुमारे १ कोटी ५१ लाखांची देणगीही दिली. साई संस्थानच्या वतीने सीईओ भाग्यश्री बानायत यांनी अनंत अंबानींचा सत्कार केला.
साई संस्थानची संपत्ती ठेवी 2,350 कोटी सोने 500 किलो चांदी 6,000 किलो हिरे 14 कोटी