महाराष्ट्र २४ ; पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे : पुण्यात सलग पाचव्या दिवशी म्हणजे, सोमवारी कोरोनाचे आणखी 50 रुग्ण बरे झाले आहे. या पाच दिवसांत जवळपास अडीचशे तर आतापर्यंत 483 रुग्ण ठणठणीत झाले आहे. तर नव्या रुग्णांची संख्या कमी होऊन सोमवारी ती 61 पर्यंत आली आहे. विविध रुग्णालयांत सध्या 1 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाने 107 जणांचा जीव घेतला आहे.
विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 76 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. पद्मावतीतील 63 वर्षांच्या पुरुषाला कोरोना झाल्याने त्यांना रविवारी (ता.3) रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. या व्यक्तीला न्युमोनिया आणि अन्य आजार होते. येरवड्यातील 61 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला असून, त्यांना कोरोना झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले होते. त्यानंतर सोमवारी मृत्यू झाला. त्यांना न्युमोनिया, उच्चरक्तदाब हदयरोगाचा त्रास होता.