महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ ऑक्टोबर । नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्या, घरफोड्या, वाहन चोरीमध्ये वाढ झाली आहे. त्यातच दिवाळीच्या सुटी असल्याने लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक चार-आठ दिवसांसाठी आपापल्या गावी वा सहलीनिमित्त जातात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांनी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंच्या वा वाहनांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
सुटीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय गस्ती पथके वाढविण्यात आली असली तरीही नागरिकांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त शाळांसह औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनाही आठवडाभराच्या सुट्या आहेत. यामुळे बहुतांशी नागरिक लक्ष्मीपूजनानंतर आपापल्या गावी वा सहलीनिमित्त दोन-चार दिवसांसाठी जातात. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात चोऱ्या, घरफोड्यांसह चारचाकी- दुचाकी वाहने चोरट्याच्या टार्गेटवर आहे. तर बंद घर- फ्लॅट दिसताच ते फोडण्याचे प्रकार भरदिवसा होऊ लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय पोलिसांची गस्ती पथकांची संख्या वाढवून सातत्याने दिवस-रात्र गस्त घातली जाणार आहे. नागरिकांनी परगावी जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये, मौल्यवान वस्तू बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत वा स्वत:समवेत बाळगावे, वाहनांची सुरक्षितता तपासून घ्यावी, बहुमजली इमारत असल्यास सुरक्षारक्षकाला सजग राहण्यास सांगावे, अनोळखी व्यक्तींना इमारतीमध्ये प्रवेश नाकारावा, शेजारी राहणाऱ्यांना सजग राहण्यास सांगावे असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्या-घरफोड्या वाढल्या आहेत. चोरट्यांकडून बंद घरांची रेकी करून चोऱ्या-घरफोड्या केल्या जात आहेत. परिसरामध्ये दिवसरात्र पोलिस गस्ती पथके असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरीही चोऱ्या-घरफोड्या, जबरी चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने पोलिस गस्तीचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून आले आहे.