महाराष्ट्र २४ ; संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी : संभाजीनगर मध्ये रात्रभरात २४ नवे करोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे संभाजीनगर मधील करोनाबाधितांची संख्या ३२१वर गेली आहे. संभाजीनगर मध्ये काल रात्री ९.३० वाजेपर्यंत ३६ नवे रुग्ण सापडले होते. त्यामुळे येथील करोनाबाधितांची संख्या २९०वर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा सहा नवे रुग्ण सापडले होते आणि आज पहाटेपर्यंत पुन्हा २४ नवे रुग्ण सापडले आहेत.
आज जयभीम नगरमध्ये २१, अजब नगर, संजय नगर आणि बौद्ध नगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. यात १४ पुरूष आणि १० महिलांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन अंकी संख्येत नवे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज सापडलेले बहुतेक रुग्ण झोपडपट्टी परिसरातील आहेत. हा झोपडपट्टीचा परिसर सील करण्यात आला असून कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे, एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.