महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ ऑक्टोबर । पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लीलावासाठी पाच शहरांची यादी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) जाहीर करण्यात आली. या वर्षी खेळाडूंचा लिलाव छोट्या स्वरूपात होणार असून त्यासाठी इस्तंबूल, बंगळूर, मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद या पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या १६ तारखेला खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
या बद्दल अधिक माहिती देताना बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले की, ‘पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावासाठी जरी पाच शहरांची निवड करण्यात आली असली, तरी अरुण सिंह धुमल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आयपीएलच्या नवीन कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर अंतिम ठिकाण निश्चित केले जाणार आहे.
आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या १० संघाना १५ नोव्हेंबरपर्यंत कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील, याची यादी बीसीसीआयकडे द्यायची असून या वेळी प्रत्येक संघासाठी सॅलरी कॅप (मानधन मर्यादा) ९५ कोटी ठरवण्यात आली आहे.