…….. मग जनतेची भीती कशाला ; ‘हा’ आमदार म्हणतोय, माझी सुरक्षा काढून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । आम्ही जनतेतूनच निवडून आलो आहोत, मग जनतेची भीती कशाला, असा सवाल करत एका भाजप आमदाराने माझी सुरक्षा काढून घ्या अशी मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर या आमदाराने गृहविभागालादेखील यासंदर्भात पत्र पाठवले आहे. 

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला एक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचारी, असं संरक्षण देण्यात आलं आहे. दोन शिफ्टमध्ये देण्यात येणाऱ्या या संरक्षणासाठी प्रत्येक आमदारामागे 12 पोलीस कर्मचारी अनावश्यकरीत्या व्यस्त झाले आहेत.

दरम्यान, राज्यातील सगळ्याच लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं अनावश्यक पोलीस संरक्षण काढून घ्यावं, अशी मागणी भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गृहविभागालादेखील पत्र लिहिले आहे. पोलीस दलावर मात्र आधीच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असताना अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं अनावश्यक पोलीस संरक्षण काढून घ्यावं, अशी मागणी किसन कथोरे यांनी केली आहे.

तसेच, ही मागणी फक्त आमदार किंवा खासदार यांच्याच बाबतीत नव्हे, तर ज्यांना ज्यांना आवश्यकता नसताना पोलीस संरक्षण दिलं आहे, त्या सर्वांचंच पोलीस संरक्षण काढून घ्यावं अशी ही मागणी असल्यासही किसन कथोरे यांनी म्हटलं आहे.

जे जनतेतून निवडून येतात त्यांना जनतेत वावरताना जनतेचीच भीती कशाला? असा सवाल करत माझं सुद्धा पोलीस संरक्षण सरकारने काढून घ्यावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. सोबतच उद्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सगळे सरपंचही पोलीस संरक्षण मागतील, त्यांना सुद्धा सरकार संरक्षण देत बसलं, तर गृह विभागावर किती भार पडेल? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *