महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि रवी राणा (ravi rana) यांच्यातील वाद अजूनही सुरूच असल्याचं चित्रं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा आणि बच्चू कडू या दोन्ही नेत्यांची समजूत काढली. त्यानंतर रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधत असताना आपण शब्द मागे घेत असून दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं स्पष्ट केलं. मात्र, बच्चू कडू यांनी मेळावा घेऊनच भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे बच्चू कडू यांचा आज हा मेळावा होत असतानाच रवी राणा यांच्या अमरावतीतील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बच्चू कडू यांनी काल मीडियाशी संवाद साधला. यावेळी उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. वाद मिटला असल्याचं बच्चू कडू यांनी थेट म्हटलं नाही.
त्यामुळे अमरावतीत बच्चू कडू यांचा मेळावा आज पार पडत आहे. या मोर्चाला 10 हजारांच्यावर कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे पोस्टर्स लागले आहेत. झुकेगा नही… असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. त्यामुळे शहरात वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे.
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी अनुचित प्रकार करू नये म्हणून रवी राणा यांच्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
काल रात्रीच पोलिसांनी रवी राणा यांच्या घराच्याबाहेर तंबू ठोकून मुक्काम ठोकला आहे. यावेळी महिला पोलीसही मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. या पोलिसांना 24 तास सख्त पहारा देण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
घराची सुरक्षा वाढवण्यात आली असली तरी रवी राणा हे अमरावतीत नाहीत. ते मुंबईत आहेत. मात्र, खासदार नवनीत राणा या अमरावतीत आहेत. मात्र, राणा यांच्या कुटुंबीयांना काही त्रास होऊ नये म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, बच्चू कडू आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना या वादावर पडदा टाकण्याचं आवाहन केल्याचं सांगितलं जातं.
त्यामुळे या मेळाव्यात रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी न करण्याचं आवाहन देण्यात आलं आहे. मंचावरून या सूचना दिल्या जात आहे. यावरून बच्चू कडू यांनी या वादावर पडदा टाकण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे.
बच्चू कडू आणि राणा दोघेही अमरावतीतील महत्त्वाचे नेते आहेत. दोघांचाही जिल्ह्यात मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. शिवाय दोघेही एकमेकांचे स्पर्धक आहेत.