महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याला 3200 ते 3500 रुपयांचा भाव मिळतो. मात्र, नेप्ती बाजार समितीमध्ये 1500 रुपयांचा भाव मिळत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी कांद्याला वाढीव दर मिळावा यासाठी आज नगर-पुणे महामार्गावरील नेप्ती बाजार समितीमध्ये ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱयांची मागणी रास्त असून, याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
राज्यात कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस भेडसावत आहे. कांद्याला भाव मिळायला तयार नाही, तर काही ठिकाणी साठेबाजी होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. राज्यामध्ये सर्वत्र कांद्याला 3200 ते 3500पर्यंत भाव मिळत आहे. मात्र, नगर जिह्यामध्ये अवघा दीड हजार रुपये भाव मिळत आहे. मागील आठवडय़ात शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले होते. आजसुद्धा साठेबाजी होणार व कांद्याला भाव मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर शेतकऱयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. नगर-पुणे महामार्गावर असलेल्या बायपासजवळील नेप्ती बाजार समितीमध्ये शेतकऱयांनी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
आज बाजार समितीत कांद्याचे लिलाव 1800 रुपयांपर्यंत सुरू झाले. इतर बाजार समितीचे बाजारभाव मात्र 3500 ते 3800 इतके असताना, नगरमध्ये मात्र 1800 रुपयांपर्यंतच होते. त्यामुळे शेतकऱयांनी लिलाव बंद पाडत संदेश कार्ले यांना बोलावून घेतले. त्यांनी लासलगाव, पारनेर येथील भाव घेतले. ते 3200 ते 3800 इतके होते. त्यानंतर शेतकरी, व्यापारी, मार्केट कमिटीचे सचिव भिसे यांनी शेतकऱयांसमोर चर्चा केली. यावेळी निखिल वारे यांनीही शेतकऱयांनी केलेल्या तक्रारींवर कांदा वाहतूक करणारे टेम्पोवाले यांना काही आडते कमिशन देतात, तसेच काही आडते स्वतः माल कमी भावात घेतात, हे मान्य केले. त्यानंतर कमी भावात गेलेला कांदा शेतकऱयांना मान्य नसल्याने त्याची जबाबदारी मार्केट कमिटीने घ्यावी, आडत्याने स्वतः माल कमी भावाने घेऊ नये, तसेच आडत्याने कांदा वाहतूक करणाऱया टेम्पोवाल्यांना कमिशन देत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सानप, कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी शिवसेनेचे नगर तालुका उपप्रमुख प्रकाश कुलट, संदीप जगताप, निखिल वारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव भिसे, कामगार प्रतिनिधी सचिन सातपुते यांच्यासह दोन ते अडीच हजार शेतकरी उपस्थित होते.