महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । टी-20 विश्वचषक 2022 मध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ हा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हलमध्ये खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे हा सामना जिंकणे टीम इंडियासाठी महत्वाचे आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल? या सामन्यात दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात डायव्हिंग करताना कार्तिकच्या पाठीला दुखापत झाली होती. सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये कार्तिकच्या जागी पंत मैदानात आला.
भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या म्हणजे सलामीवीर केएल राहुलचा फ्लॉप शो आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे की या फलंदाजाला पाठिंबा मिळत राहील, याचा अर्थ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या शीर्ष क्रमात कोणताही बदल करणार नाही. म्हणजेच प्लेइंग-11 मध्ये केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार हे वरच्या फळीतील फलंदाज असतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळाली होती. अक्षर पटेल बांगलादेशविरुद्ध प्लेइंग-11 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता कमी आहे. तसेच त्या संघात शाकिब, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो आणि अफिफ हुसेनसारखे डावखुरे फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महागडा ठरलेला रविचंद्रन अश्विनला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांंड्या, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.