महाराष्ट्र २४ – ऑनलाईन । पुणे । विशेष प्रतिनिधी। ओमप्रकाश भांगे – मोटारीतून गुटख्याची विक्री करणाऱ्या एकाला घोरपडे पेठ परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट तीनने जेरबंद केले. त्याच्याकडून एक मोटार आणि गुटखा मिळून ३ लाख २६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. अकिल शकील शेख (वय २८, रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेत एकजण मोटारीतून गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता, अकिल गुटख्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे विमल पान मसाला, हिरा गुटखा, सुगंधी तंबाखु, मोटार असा मिळून ३ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक किरण अडागळे, दत्तात्रय गरुड, संतोष क्षीरसागर, मच्छिंद्र वाळके, अतुल साठे, सुजित पवार यांच्या पथकाने केली.