‘सामना’च्या पहिल्या पानावर मोदी आणि एकनाथ शिंदेंची जाहिरात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ नोव्हेंबर । राज्यातील सत्तापालटानंतर ठाकरे गटाकडून भाजप आणि शिंदे गटावर सातत्याने आगपाखड केली जात आहे. विशेषत: शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी ठाकरे गटाकडून सोडली जात नाही. अर्थात शिंदे गटाचे नेतेही या सगळ्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. या सगळ्यामुळे सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे-फडणवीस असे चित्र पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यासाठी शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाचा पुरेपूर वापर केला जात आहे. मात्र, आता याच सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात झळकल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आलेले आहे. या जाहिरातीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्ष एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प पहिल्या टप्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रमाची ही जाहिरात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. आज अकरा वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे याबाबतच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र, या कार्यक्रमाची जाहिरात आणि त्यामध्ये ठळकपणे पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा असलेला फोटो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे एवढे राजकीय वितुष्ट असताना ‘सामना’मध्ये मोदी आणि एकनाथ शिंदेचा फोटो पहिल्या पानावर कसा झळकतो, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती नाकारल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती पाठवल्या पण त्या नाकारण्यात आल्याचे खासदार शेवाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *