शरद पवारांची राष्ट्रवादीच्या शिबिराला हॉस्पिटलमधून हजेरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा या शिबिराचे शिर्डी येथे उद्घाटन झाले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. न्यूमोनियाची लागण झाल्याने पवारांवर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र शिबिराला उपस्थित राहण्याबाबत कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पवारांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

“आजार, व्याधी, दुःख, त्रास असा कोणताही शब्द ज्या व्यक्तीला जनमानसात मिसळण्यापासून विभक्त करू शकत नाही, अशा शरद पवार यांनी पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला पहिल्या दिवशीच ऑनलाईन हजेरी लावून पुन्हा एकदा आपला शब्द राखून दाखवला. हीच त्या आधारवडाची खरी ओळख.” अशा भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. पवारांची क्षणभराची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अचानक झालेली भेट संपूर्ण कार्यक्रमाला व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन गेल्याचंही बोललं गेलं.

दरम्यान, आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टीका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *