विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी ; नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांचं अज्ञान…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर नारायण राणे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. विनायक राऊत अज्ञानी आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार थापा मारतात अशी टीकाही केली. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात खडाजंगी झाली. बैठक संपल्यानंतरही या वादाचे पडसाद पाहायला मिळाले.

बैठकीत काय झालं?
सभेच्या अजेंड्यानुसार बैठक चालावी असं नारायण राणे यांचं म्हणणं होतं. दरम्यान विनायक राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारचा मुद्दा मांडला. मागील सरकारने घेतलेले सर्व निर्णय सध्याच्या सरकारने रद्द केले असून, त्यावर विचार व्हावा असं ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी मध्यस्थी करत अजेंड्यावर असणारे विषय आधी घेऊयात असं सांगितलं. त्यावर विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. यावर विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना ‘ही बैठक नेमकं कोण चालवत आहे?’ अशी विचारणा केली.

राणे काय म्हणाले ?
“कोणता विषय कधी घ्यावा, हे विनायक राऊत यांना समजत नाही. हे त्यांचे अज्ञान आहे,” अशी टीका नारायण राणे यांनी केली. मी असताना विनायक राऊत सुरवात करू शकतात का? असंही ते उपहासात्मकपणे म्हणाले.

“गेल्या अडीच वर्षाच यांनी अधिकाऱ्यांची भरती केली नाही. आता या सरकारवर आरोप करत आहेत. एका दिवसात इतक्या जागा रिक्त होत नाहीत. आरोग्य विभागात ४०० जागा रिक्त आहेत त्या काही अडीच महिन्यात झालेल्या नाहीत, हे अडीच वर्षांचं पाप आहे. साधा जिल्ह्याचा विकास करु शकले नाहीत. ६० कोटी परत तिजोरीत जमा करावे लागले,” अशी टीका त्यांनी केली.

विनायक राऊत यांनी मांडली बाजू
बैठकीनंतर विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणेंशी झालेल्या वादावर भाष्य केलं. “मी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्वागत केलं आहे. ते सिंधुदूर्गाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे त्याचा आनंद आहे. पण सरकारने १२ ऑक्टोबरला एक निवेदन जारी केलं होतं, त्यात त्यांनी सर्व कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे हे गतिमान सरकार नव्हे तर ही स्थगिती सरकार आहे. फक्त १० टक्के निधी खर्च झाला आहे. स्थगिती दिल्याने विकासकामांना खीळ घातली जात असल्याच्या अनुषंगाने मी प्रश्न विचारला होता. पण पालकमंत्री उत्तर देण्यास सक्षम असतानाही केंद्रीय मंत्री लुडबूड करत होते. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे,” असं ते म्हणाले.

भाजपा कार्यकर्त्यांच्या घोषणा
विनायक राऊत बोलत असतानाच भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. ‘भाजपाचा विजय असो’, ‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा ते देऊ लागले. प्रसारमाध्यमांनी याबद्दल विचारल्यानंतर राऊत म्हणाले, आमच्या घोषणा १० पटीने जास्त आहेत. घोषणा देणारे देतील, आम्ही अशा घोषणांना भीक घालत नाही.

“हे सरकार असंच करत आहे. प्रत्येक ठिकाणी भाषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा आणि आवाज दाबायचा हेच काम सुरु आहे. सरकारकडून दडपशाहीचं सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *