महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ नोव्हेंबर । राज्यात एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी बंड केलं. त्यानंतर राज्यात दावे प्रतिदावे, आरोप यांना उधाण आलं. त्यानंतर पक्षांतर करण्यालाही वेग आला. अशातच आता शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री यांनी बंड का केलं याचं स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बोलताना पाटील म्हणाले की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. आता फक्त त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरायचा बाकी आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. आताही शिंदे गटाने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, असा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अधिवेशन संपलंय. पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जातयात, त्याचबरोबर आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.