गुजरात सोडण्यासाठी भाजपाची AAP ला ऑफर; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ नोव्हेंबर । गुजरात निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावेळी काँग्रेसनं निवडणुकीत ९९ जागा मिळवत अस्तित्व राखलं होते. यंदा सत्ताधारी भाजपाला काँग्रेससोबतच आम आदमी पक्षाचं मोठं आव्हान आहे.

त्यात दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपनं सर्वच राजकीय पक्षांना धक्का देत सरकार स्थापन केले. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देण्यात आपचीही महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप मोठा दावा केला आहे.

केजरीवाल म्हणाले की, तुम्ही गुजरात सोडा, आम्ही सत्येंद्र जैनला सोडू अशी ऑफर भाजपाने दिल्याचं केजरीवालांनी सांगितले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी सत्येंद्र जैनवर लावलेले आरोप भाजपाची बनावट कथा आहे. मोरबी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपानं ही कहाणी बनवली. परंतु त्याला जनता बळी पडणार नाही असा टोला केजरीवालांनी लगावला.

सत्येंद्र जैन यांना आणखी ३ महिने जेलमध्ये ठेवा, आम्हाला तोडू शकणार नाही. आम्ही जनतेचा आवाज आहे. सत्येंद्र जैन यांच्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया समजायला हवी, १५ सप्टेंबरच्या आसपास जामीन मिळाला, मग न्यायाधीश बदला, तुम्ही पुरावे देऊ शकत नसाल तर न्यायाधीश बदला.

त्यानंतर दीड महिन्यांपासून न्यायाधीश बदलण्याची प्रक्रिया सुरू असून, आता १० दिवसांपूर्वी जामीनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुजरात निवडणुकीची चर्चा सुरू असताना केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला.

भाजपाने येथे काम केले असते तर २७ वर्षांनंतर गुजरातमध्ये आम्हाला स्थान मिळाले नसते. गुजरातचे लोक केजरीवाल यांना आपला भाऊ मानू लागले आहेत, मीदेखील त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग मानतोय. मी गुजरातच्या जनतेला वचन दिले आहे की, आमचे सरकार स्थापन झाले तर तुमच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून मी जबाबदारी घेईन असं वचन केजरीवालांनी दिलं आहे.

गुजरात निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात यावेळी आम आदमी पक्षही गुजरात निवडणुकीत उमेदवार उतरवणार आहे. आपने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून इसुदान गढवी यांना पुढे केले आहे.

आगामी निवडणुकीसाठी केजरीवालांनी OTP फॉर्म्युला वापरण्यावर भर दिला आहे. या OTP फॉर्म्युल्याच्या बळावर आप निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला टक्कर देणार आहे. ओटीपी म्हणजे ओबीसी, ट्रायबल आणि पाटीदार.

आम्ही ओबीसी समुदायाला मुख्यमंत्री म्हणून पुढे आणलं आहे. आम आदमी पक्षाला ट्रायबलचं समर्थन मिळत आहे. त्याचसोबत आपचे अध्यक्ष पाटीदार समाजाचे आहेत. या तिन्ही समुदायासोबतच इतरही आमच्या बरोबर आहेत असं केजरीवालांनी सांगितले.

कारण आम्ही वीज मोफत देणार आहोत ते सगळ्यांसाठी आहे. जर शाळा बनवली तर ती सगळ्यांसाठीच आहे. आमचा पक्ष कोणत्या एका जातीचा नाही. आम्ही सर्व समुदायासाठी काम करतो असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *