महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – मद्यविक्रीवरील बंधने उठवताच अवघ्या दोन दिवसात राज्यात ६२ कोटी ५५ लाखांची १६ लाख १० हजार बल्क लीटर दारु विक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
सोमवारी सुमारे १२ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. जेथे दुकाने सुरू होती , अशा भागांत सकाळपासूनच दारू खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. चार-चार तास रांगेत थांबून अनेकांनी दारू खरेदी केली. कोणत्याही क्षणी पुन्हा दारूविक्री बंद होऊ शकते, असा अंदाज बांधून अनकांनी हजारो रूपयांची दारू खरेदी केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या दुकानांच्या परिसरात प्रचंड गर्दी होऊ लागल्याने बंदोबस्त पुरवून रांगा लावण्याची वेळ आली. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना करण्यात आली. सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सूचना सतत दिली जात होती. गर्दी प्रचंड वाढल्याने राज्याच्या काही जिल्ह्यांतील मद्यविक्री दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आली. मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयांनी मद्यविक्रीबाबतचे निर्देश सोमवारी दुपारी दिले. त्यानंतर मद्यविक्री सुरू झाली. काही ठिकाणी रांगेत उभे राहण्यावरून बाचाबाचीचे प्रकार घडले. अनेक दुकानदारांनी ग्राहकामागे किती दारू दिली जाईल, याचे प्रमाण ठरवून दिल्याने काही ग्राहक पुन्हा पुन्हा रांगेत उभे रहात असल्याचेही पाहायला मिळाले.