महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा असतानाच केंद्र सरकारने मंगळवारी रात्रीपासून या दोन्ही इंधनावर आकारला जाणारा अबकारी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवरील हा कर 10 रुपयांनी तर डिझेलवर हा कर 13 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्र सरकारने अबकारी करात मोठी वाढ केल्याने ग्राहकांना स्वस्तात इंधन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. कोरोनाच्या जगभरातील फैलावामुळे कच्चा तेलाची मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झाली असतानाच अमेरिका, रशिया आणि अन्य तेल उत्पादक देशांमध्ये तेलाच्या उत्पादनाची स्पर्धा लागली आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्याने कच्चा तेलाच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे.अबकारी करात वाढ केल्याने ग्राहकांना तूर्तास कोणताही फटका बसणार नाहीये. विक्रीदर हे पूर्वीसारखेच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असलं तरी ग्राहकांना स्वस्तात इंधन मात्र मिळू शकणार नाहीये.
Govt hikes excise duty on petrol by Rs 10/litre, on diesel by Rs 13/litre
— Press Trust of India (@PTI_News) May 5, 2020
एकीकडे काही देशांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्ये मोठी कपात केलेली असतानाच हिंदुस्थानात मात्र हे दर कमी झालेले नाहीत. मागील अनेक दिवसांपासून यात फारसा बदलही झालेला दिसत नाहीये. 25 एप्रिलपासूनच्या आकड्यांवर नजर टाकल्यास पेट्रोलचा मुंबईतील दर हा 76.31 रुपये इतका आहे. डिझेलचा दर हा 66.21 रुपये प्रति लिटर इतका आहे.