मध्यावधीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सूचक वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय, आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी केलाय. तसंच मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, यासाठी सुरू केलेला टाईमपास आहे, असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज डोंबिवलीच्या काटई गावात तुळशी विवाह सोहळ्यासाठी आले होते. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत खासदार श्रीकांत शिंदेंना विचारलं असता, महाराष्ट्राला सध्या अतिशय स्थिर सरकार मिळालं आहे. त्यात शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात असून हा निव्वळ टाईमपास असल्याचं खासदार शिंदे म्हणाले. ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

हे सरकार गेल्या तीन महिन्यात ज्या पद्धतीने लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. ते पाहता दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत यांची काय परिस्थिती होईल? याचा विचार करून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हे मध्यावधी निवडणुकीचं भूत समोर आणलं जात असल्याची टीका श्रीकांत शिंदेंनी केली. तर काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आमचा आकडा किती वाढतो, हे येणाऱ्या काळात कळेलच, सगळ्यांचे आमदार आमच्या संपर्कात असून सगळ्या गोष्टी आत्ताच सांगता येणार नाहीत, असं म्हणत थोडा धीर धरा, सबर रखो.. असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदेंनी केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपुत्रानेच हे वक्तव्य केल्यानं राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता व्यक्त होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *