महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ नोव्हेंबर । भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आता भारतासमोर तगड्या इंग्लंडचे आव्हान आहे. भारताच्या तुलनेत ग्रुप १ अधिक आव्हानात्मक होता आणि त्याचा सामना करताना इंग्लंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. त्यामुळे भारतासाठी ही लढत सोपी नक्कीच नसेल. मात्र, त्याचवेळी इंग्लंडला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा स्टार फलंदाज आणि आयसीसी क्रमवारीत आघाडीवर असलेला डेवीड मलान ( Dawid Malan) उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात १० नोव्हेंबरला एडिलेड येथे उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या लढतीपूर्वी इंग्लंडला धक्का बसला आहे. स्टार फलंदाज डेवीड मलान याला श्रीलंकेविरूद्धच्या लढतीत दुखापत झाली. १५व्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यानंतर तो लगेच मैदानाबाहेर गेला. तो फलंदाजीलाही आला नाही. ”दुखापतीमुळे त्याला मैदानावर उतरता आले नाही. आशा करतो की तो बरा होईल. त्याला नेमकं काय झालंय, हे आम्हालाही अद्याप माहीत नाही,”असे आदील राशिद म्हणाला.