१०० दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर ; ठाकरे गटाची तोफ तुरुंगातून बाहेर येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ नोव्हेंबर । गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिवसेनेचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संजय राऊत हे चोखपणे पार पाडत होते. संजय राऊत भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची भूमिका लोकांना पटवून देण्याचे काम करत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत काही काळातच तुरुंगात गेल्याने ठाकरे गटाकडे प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणार प्रभावी वक्ता उरला नव्हता. मात्र, आता संजय राऊत पुन्हा तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा एकदा नव्या जोमाने भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडताना दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *