महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ नोव्हेंबर । ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून, चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याच्या आरोपामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये ‘हर हर महादेव’वरून मनसे-संभाजी ब्रिगेडमध्ये राडा पाहायला मिळत आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपट पुन्हा सुरु करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली असून, संभाजी ब्रिगेडने याला विरोध केला आहे.
औरंगाबादच्या फेम तापडिया चित्रपटगृहात मनसे आणि संभाजी ब्रिगेड काही वेळापूर्वी आमने-सामने आले होते. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. तर चित्रपट सुरु करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली तर, संभाजी ब्रिगेडने याला विरोध करत शो बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण याठिकाणी पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाने वेगळे करत, ताब्यात घेतले आहे. मात्र चित्रपटगृहाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.