महाराष्ट्र २४- बुलडाणा, (जिमाका) – विशेष प्रतिनिधी ; गणेश भड : कोरानो विषाणूचा शिरकाव देशात झाल्याचे लक्षात घेता भविष्याचा वेध घेत केंद्र शासनाने देशभर 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू केले. त्याची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीही करण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे राज्यात असलेली परप्रांतीय मजूर अडकून पडले. राज्य शासनाने अशा स्थलांतरीत व अडकून पडलेल्या मजूरांना वाऱ्यावर न सोडता त्यांची निवास, भोजनाची मोफत व्यवस्था केली. राज्यातील विविध भागातून पायीच आपल्या घराची वाट धरणाऱ्या मजूरांना जिल्ह्यात आले असताना प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रांमध्ये त्यांना ठेवण्यात आले. त्यांची भोजन, निवासासह समुपदेशन, आरोग्य तपासणी व मनोरंजनाची व्यवस्थाही करण्यात आली. उत्तर प्रदेश राज्यातील अशाच स्थलांतरीत 507 मजूरांना प्रशासनाने मोफत त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी भुसावळ जि. जळगांव येथे रेल्वे स्थानकावर पोहोचविले.
भुसावळपर्यंत जिल्ह्यातील विविध निवारा केंद्रात असलेल्या मजूरांना विविध वाहनांची व्यवस्था करून प्रशासनाने पोहोचविले. भुसावळ रेल्वे स्थानकातून विशेष श्रमजीवी ट्रेन लखनौसाठी सायं 6 वाजता सुटली. या ट्रेनमध्ये जळगांव, धुळे आदी जिल्ह्यांतील मजुरांसह बुलडाणा जिल्ह्यातील 507 मजूर लखनौसाठी रवाना झाले. सदर ट्रेन लखनौ येथे सकाळी 8 वाजता पोहोचणार आहे. प्रशासनाने निवारा केंद्रामध्ये केलेल्या व्यवस्थेबद्दल मजूरांनी प्रशासनाने धन्यवाद मानले.
‘हमारा घर जैसा ख्याल रखा.. सभी साहब लोगो ने हमारी खाने, रहने की बहोत अच्छी व्यवस्था की. हमे अपने घरवालो से बात करनेका इंतेजाम भी करवाया. यहा हमारी घर जैसी व्यवस्था हुई.. ये खातीरदारी हम कभी नही भुलेंगे’ अशा शब्दात मजूरांनी प्रशासनाचे आभार मानले. मजूरांना केवळ स्टेशनपर्यंत आणून प्रशासन थांबले नाही, तर मजूरांना एक वेळचे जेवनाचा डब्बा, पाण्याची बाटली, चहाची व्यवस्थाही प्रशासनाने केली. यावेळी भुसावळ स्टेशनवर जिल्ह्यातील महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ट्रेन सुटण्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मजूरांना टाळ्या वाजवून आनंदाने भावपूर्ण निरोप दिला. यावेळी मजूरही भारावून गेले होते.
अशाप्रकारे जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यापासून निवारा केंद्रात असलेल्या मजूरांची पावले शासनाच्या सहकार्यामुळे त्यांच्या घराकडे वळाली आहेत. लवकरच त्यांना त्यांचे घरटे जवळ होणार आहे.