Sanjay Raut: भाजप संजय राऊतांना पुन्हा घेरण्याच्या तयारीत? फडणवीसांचा खास माणूस पुन्हा सक्रिय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. याविरोधात ईडीने जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली, परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे संजय राऊत यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या घरी जाताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात सत्तांतर होण्यापूर्वीपासूनच संजय राऊत आणि मोहित कंबोज यांच्याकडून एकमेकांवर अनेकदा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. संजय राऊत यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात मोहित कंबोज हे कायमच आघाडीवर होते. काही महिन्यांपूर्वी मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळल्याचा आरोप केला होता. यानंतर पत्राचाळ प्रकरणातही संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील, असे अनेक इशारेही मोहित कंबोज यांनी दिले होते. त्यांचे हे भाकीत खरेही ठरले होते. परंतु, संजय राऊत तुरुंगात गेल्यापासून मोहित कंबोजही फारसे चर्चेत नव्हते, ते लाईमलाईटपासून दूर होते. परंतु, बुधवारी संजय राऊत यांनी तुरुंगाबाहेर पाऊल ठेवताच मोहित कंबोज यांनी ट्विट करुन पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा, असे मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी,’अजूनही हिशेब पूर्ण झालेला नाही, आणखी काही प्रकरणांमध्ये राऊत यांची चौकशी होणे गरजेचे आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा संजय राऊत विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *