महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । संपूर्ण देशात लोकसभा आणि विधासनभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना ‘एक देश एक निवडणूक’ याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, 2024 साली होणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुका या एकत्रितपणे घेणे निवडणूक आयोगाच्या दृष्टीने शक्य आहे. त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेबाबतचीही आमची सज्जता आहे मात्र, हा धोरणात्मक निर्णय असून याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
उद्योग क्षेत्रात कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग संस्थांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक राजीव कुमार यांनी केले. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील टेक महिंद्रा – फेज 3 येथे आयोजित कार्यक्रमात उद्योगांमधील मतदार जागृती मंचाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, टेक महिंद्राचे उपाध्यक्ष सतीश पै, उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.