महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० नोव्हेंबर । संजय राठोड (Sanjay Rathod) हा विषय आता संपवूया, असं मोठं वक्तव्य भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलंय. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांनाच धक्का देणारं हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे दोषारोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी अचानक युटर्न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा ठपका भाजप तसेच महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता. मात्र आता शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यावर चित्रा वाघ यांनी ही भूमिका घेतली आहे.
काय नेमकं म्हणाल्या?
अमरावतीत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘ संजय राठोड प्रकरण आता संपवूया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात लढा सुरूच राहील पण तो न्यायालयात. तेथे माझा लढा सुरू राहील. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही विचारा असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला आहे.