महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी ;कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने जास्तीची खरेदी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली ४० हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा ५० हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी अजित पवार केंद्राकडे केली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही. अनुकूल वातावरणामुळे रब्बी हंगामातही कांद्याचं उत्पादन वाढणार आहे. तो कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव गडगडण्याची आणि त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्याद्वारे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यंदा कांद्याचं चांगलं उत्पादन झाले आहे. कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही, त्यामुळे हा कांदा केंद्र सरकारने खरेदी करावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.