महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.