Gajanan Kirtikar: शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकरांच उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ नोव्हेंबर । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटावर पहिला वार केला आहे. इतके सगळे घडल्यानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडतील, असे मला वाटले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून तसे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्यामुळे मी अखेर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे गजानन किर्तीकर यांनी सांगितले. एका योग्य मार्गाने शिवसेना नेण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस आहे. शिवसेनेचे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे, मराठी माणसाचे विचार त्यांनी अंगीकारले. त्यावर ते मार्गक्रमण करत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. खऱ्या अर्थाने ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे नेत आहेत. त्यामुळे मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे गजानन किर्तीकर यांनी सांगितले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताना पहिल्यांदाच आपली भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. पक्षातील फुटीनंतर आम्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, असे सांगितले होते. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते १२ खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही, अशा शब्दांत गजानन किर्तीकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

ठाकरे आणि शिंदे गटाने यंदा दसरा मेळावा एकत्र साजरा केला असता तर तो भव्यदिव्य झाला असता. त्यासाठी समेट करा, असं आमचं म्हणणं होतं. मुंबईत एका दिवशी एवढी ताकद एकवटली, जर या दोन शक्ती एकत्र आल्या, समेट घडला तर शिवसेना किती मोठी होऊ शकेल. या सगळ्याची आम्ही वाट पाहात होतो. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा प्रवास उद्धव ठाकरेंनी थांबवायला हवा होता. पण ते काही आम्हाला दिसले नाही, असेही किर्तीकर यांनी म्हटले.

गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी

काल मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळं कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पत्रक खासदार विनायक राऊत यांच्याकडून जारी करण्यात आले.शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *