Suhas Kande : शिंदे गटातील आमदार सुहास कांदें नाराज , मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ नोव्हेंबर । जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे ( Suhas Kande ) यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पदाधिकारी निवडताना पालकमंत्र्यांनी म्हणजेच दादा भुसे ( Dada Bhuse ) यांनी आपल्याला डावललं. आम्हाला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. पदाधिकाऱ्यांची निवड पूर्णपणे चुकीची असल्याची खंतही सुहास कांदे यांनी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही तयारी केली जात नाही, हे दुर्दैव असल्याचं सुहास कांदे म्हणाले आहेत. चुकीच्या पदाधिकाऱ्यांमुळे शिंदे गटाला फटका बसू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात सुहास कांदे यांच्या पदाधिकारी निवडीच्या नाराजीमुळे शिंदे गटाचे टेंशन वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या मंगळवारी संभाव्य नाशिक दौरा आहे. त्याआधीच शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. पण मरेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याचे कांदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या कुठल्याही कार्यक्रमात आणि प्रमुख बैठकांमध्ये न दिसल्याने आमदार कांदे नाराज असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असताना सुहास कांदे हे मुख्यमंत्र्यांसोबत दिसले नव्हते. या प्रश्नावर पत्रकारांनी कांदे यांना विचारलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला आले, त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात होतो आणि याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली होती, असे कांदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात नाशिकमध्ये करण्यात आले होते. यावेळी देखील सुहास कांदे हे उद्घाटन सोहळ्यात नव्हते. शिंदे गटाचे नाशिकमध्ये कार्यालय कुठल्या ठिकाणी आहे आणि त्याचे उद्घाटन कधी झाले याची मला कल्पना नाही, असे सुहास कांदे यांनी सांगितल्याने शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *