महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ नोव्हेंबर । ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माणमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ), राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि ११ कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले होते.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर अजूनही टांगती तलवार आहे. न्यायालयात आव्हाडांचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांकडून आव्हाडांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ठाणे न्यायालयाने संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास या प्रकरणी निर्णय दिला. न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आव्हाड यांच्या वकिलांकडून त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर ३ वाजता सुनावणी होईल. यावर ४ वाजेनंतर निकाल येण्याची शक्यता आहे.
आव्हाड यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत होत्या. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच पोलिसांकडून कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते.