महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ नोव्हेंबर । RBI देशभरातील बँकांच्या कारभारावर कायम लक्ष ठेवते. यामध्ये सरकारी आणि खासगी या दोन्ही प्रकाराच्या बँकांवर आरबीआयचा अंकुश असतो. जर बँका नियमानुसार वागल्या नाहीत रत्यांना नोटीस देण्यात येते. त्यानंतर ही बँकांचे कामकाज सुधारले नाही तर अशा बँकांविरोधात कडक कारवाई करण्यात येते.
RBI काही बँकांना कारभार सुधारण्याची संधी देते. त्यांच्यावर दंड लावते. दंड वसूल करते. तरीही बँकांचे कामकाज सुधारले नाही तर, बँकांचा परवाना रद्द करण्यात येतो. अशा बँकांमधील गुंतवणूकदारांच्या ठेवी काही प्रमाणात परत करण्यात येतात.
RBI ने महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कडक कारवाई केली आहे. या बँकेचा परवाना केंद्रीय बँकेने रद्द केला आहे. शुक्रवारी केंद्रीय बँकेने कारवाईचा बडगा उगारला. बँकेने नियम तोडल्याचा ठपका ठेवला आहे.
आरबीआयकडे उपलब्ध आकड्यांनुसार, या कारवाईनंतर सहकारी बँकेच्या 79 टक्के ठेवीदारांना दिलासा मिळेल. त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळविता येईल.
यापूर्वी अनेक बँकांच्या ठेवीदारांना DICGC कडून मदत मिळाली आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंत DICGC ने देशभरात एकूण विमा राशीपैकी 294.64 कोटी रुपये ठेवीदारांना नुकसान भरपाईच्या रुपात देण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडला बँकिंग व्यवसाय करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे बँकेला आता ठेवीदारांकडून ठेवी जमा करता येणार नाही आणि रक्कम ही वाटप करता येणार नाही.