‘पेराल तेच उगवेल, पवार कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर’, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । शरद पवारांनी राज्यात अनेक घरं फोडली, त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच उगवत आहे. शरद पवारांच्या घरात उभी फूट पडण्याचं वातावरण तयार झालं आहे, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची सूज आली होती. सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली आहे. आता त्यांच्या पोटात दुखत आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला. ते सांगलीमध्ये बोलत होते.

‘भारतीय जनता पार्टी विचाराने प्रेरित होऊन काम करते, म्हणून आमचा एकही आमदार फुटणार नाही. पवारांच्या घरात उभी फूट पडते का काय, असं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे. तुम्ही राज्यातली एवढी घरं फोडली, एवढ्या लोकांना फोडलं, त्यामुळे तुम्ही जे केलं, तुम्ही जे पेरलं, ते उगवणार आहे. हा भाजपचा आणि भाजपच्या विचारांचा विजय आहे,’ असं पडळकर म्हणाले.

दरम्यान पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांच्या घरात फूट पडली आहे, ती मोजण्यासाठी पडळकर फुटपट्टी घेऊन गेले होते का, माहिती नाही, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मात्र पडळकर यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. गोपिचंद पडळकर यांचं वक्तव्य कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनासाठी होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *