महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ नोव्हेंबर । सध्या देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे, तर काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. देशाची राजधानी दिल्लीत सध्या प्रदुषणामुळं लोकांचे हाल होत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आज (14 नोव्हेंबर) आणि उद्या (15 नोव्हेंबर) ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडं तामिळनाडूमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. आजही तिथे पावसाचा रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात तमिळनाडूसह केरळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
पंजाब हरियाणामध्ये हलक्या पावसाची शक्यता, दिल्लीत ढगाळ वातावरण
गेल्या काही दिवसांपासून अंदमान आणि निकोबार बेटांवर पाऊस सुरु आहे. मात्र, तिथे आज पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या चार दिवसांत तिथे पुन्हा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पंजाबमध्ये आज हलका पाऊस पडू शकतो, त्यामुळं तापमानात काहीशी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस , तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज हरियाणाच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं तापमानात घट होऊन थंडी वाढेल.
हिमाचलमध्ये काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी
हिमाचल प्रदेशात आज हवामान खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टीबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, हिमाचल, शिमला, सोलन, कुल्लू, चंबा, सिरमौर, उना, बिलासपूर, हमीरपूर आणि कांगडा या भागात पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह राजस्थानात कसे असेल हवामान
राजस्थानच्या काही भागात आज धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजस्थानमध्ये आज कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आहे, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्याचबरोबर मुंबईत आज कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. महाराष्ट्रात तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे.