महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ नोव्हेंबर । भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून आव्हाड यांच्याकडून वकील गजानन चव्हाण यांनी युक्तिवाद केला. ‘सदर महिलेला मी बहीण मानतो, त्यामुळे गर्दीत तिला खांद्याला धरून बाजूला केलं,’ असा युक्तिवाद आव्हाड यांच्यातर्फे गजानन चव्हाण यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी तक्रार महिलेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात भाषण करताना आव्हाड यांनी सदर महिलेचा बहीण असा उल्लेखही केला होता. या भाषणाचा व्हिडिओ वकील गजानन चव्हाण यांनी कोर्टासमोर सादर केला. तसंच ‘घटनास्थळी प्रचंड गर्दी होती. गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो?’ असा युक्तिवादही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामिनावर कोर्टाकडून दुपारी २ वाजता निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला जातो की त्यांना अटक करण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ठाण्यातील कळवा खाडी पुलाची एक मार्गिका आणि मुंब्य्रातील वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये झाले. वाय जंक्शन येथील लोकार्पण सोहळ्याला भाजपच्या एक महिला पदाधिकारी आल्या होत्या. ‘पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री गाडीतून जात असताना या गाडीच्या डाव्या बाजूला पुढे उभी असताना, समोरून आलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मला बाजूला ढकलत माझा विनयभंग केला’, अशी तक्रार या महिला पदाधिकाऱ्याने केली. हा प्रकार रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडल्याचे महिलेचे म्हणणे असून तिच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा १२ वाजून ३७ मिनिटांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.