आफताबचा कबुलीजबाब, तरीही त्याला शिक्षा मिळवून देण्याचे आव्हान, श्रद्धाला न्याय कसा मिळणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ नोव्हेंबर । श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. पोलिसांनी अफताब पूनावालाला अटक केली असून त्याचा पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही केस कोर्टात उभी राहिल्यावर केस अधिक मजबूत कशी होईल, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. आरोपीने कबुलीजबाब दिल्यानंतरही हे प्रकरण पोलिसांसाठी अवघड असणार आहे. जाणून घेऊया नक्की काय आहेत समस्या.

हत्येचा उलगडा झाल्यानंतर अफताबने पोलिसांसमोर कबुलीजबाब दिला आहे. मात्र, अफताबच्या कबुलीजबाबाबरोबरच कोर्टात त्यांसंबंधी पुरावेदेखील महत्त्वाचे ठरणार आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकटे करुन दिल्लीतील जंगल परिसरात विविध ठिकाणी फेकण्यात आले. पोलिसांनी जंगलातील विविध भागातून काही हाडे गोळा केली आहेत. मात्र, ते अवशेष श्रद्धाचेच आहेत का हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीयेत. त्यामुळं मृतदेहाचे सर्व अवयव एकत्रित ताब्यात घेऊन पोलिसांना ते श्रद्धाचेच आहेत, हे सिद्ध करावं लागणार आहे. पोलिस मृतदेहाची डीएनए चाचणी करणार आहे. त्यानंतरच पोलिसांनी ताब्यत घेतलेले मृतदेहाचे तुकडे श्रद्धाचेच आहेत का हे सिद्ध होणार आहे.

आरोपीला मृतदेहाची विल्हेवाट लावायला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मिळाला होता. या कालावधीत अफताबने घरात पडलेले रक्ताचे डाग केमिकलने अनेकवेळा साफ केले. त्यामुळं फॉरेन्सिक टीमला फ्लॅटची तपासणी केल्यानंतर पुरावे सापडणार का हा मोठा सवाल उपस्थित होतोय. तसंच, ज्या फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते. तो अफताबने पूर्ण स्वच्छ केला आहे. रक्ताच्या डागांचे निशाणही त्याने मागे सोडले नाहीयेत.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. ज्या रस्त्यांवरुन अफताब मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जायचा त्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांना ठोस पुरावे हाती लागले नाहीयेत. आज दिल्ली पोलिस अफताबला घेऊन घटनास्थळी गेले होते. तसंच, जंगलात ज्या ठिकाणी त्यांनी मृतदेहाचे तुकडे फेकले होते तिथेही पोलिस त्याला घेऊन गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *