महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ नोव्हेंबर । उद्धव ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टानं धक्का दिला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टानं उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळली आहे. हायकोर्टानं निवडणूक आयोगाला या प्रकरणी तातडीनं अंतिम आदेश घेण्याचा आदेश दिला आहे.
८ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं होतं. अंधेरी पोटनिवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा तात्पुरता निर्णय आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कधी निकाल देणार यांसदर्भात स्पष्ट झालेलं नाही.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं. सर्वोच्च न्यायालयानंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या अंधेरी पू्र्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात धाव घेण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं दुसरीकडे शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
दिल्ली हायकोर्टानं उद्धव ठाकरे गटानं दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह गोठवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा असल्याचं म्हणत दिल्ली हायकोर्टानं या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.