Jitendra Awhad: गर्दीत एकटीच महिला कशी, मुद्दाम माझ्यासमोरून चालत आली, आव्हाडांचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ नोव्हेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात न्यायालयाने मंगळवारी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक खुलासा केला. याप्रकरणचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. मला मुंब्र्यातील पत्रकारांनी काही गोष्टी सांगितल्या. कळव्यात जो कार्यक्रम पार पडला त्यावेळी संपूर्ण गर्दीत फक्त एकच स्त्री होती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून एका बाजूने पुढे निघालो. मी एका साईडला श्रीकांत शिंदे यांना ढकलून मागच्या बाजूला गाडीकडे पाठवले. मी पोलिसांना पार करून पुढे आलो. मी त्यावेळी गाडीला चिकटलो होतो. तेव्हा त्या बाई मुद्दाम माझ्या समोरुन चालत आल्या. मी त्यांना बाजूला केलं नसतं तर त्या माझ्या अंगावर आपटल्याच असत्या.

त्या बाई माझ्या अंगावर आदळल्या असत्या तर मला बचावाचा कुठलाही चान्स मिळाला नसता. मग त्या बाईंनी आरोप केला असता जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले. बरं झालं, देवाने मला काय बुद्धी दिली, मी त्यांना हाताने बाजूला केले. एवढ्या गर्दीत कशाला आलीस, हे माझं वाक्यही व्हिडिओत स्पष्टपणे ऐकू येत आहे. इतका घाणेरडा, किळसवाणा प्रकार करायचा आणि त्याला वरुन आशीर्वाद मिळवायचे, हा म्हणजे कहरच आहे. एखाद्याला सामाजिक आणि राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी बदनामीचे षडयंत्र रचण्यात आनंद कसला आला, असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. कळव्यातील एका कार्यक्रमात गर्दीतून वाट काढत असताना जितेंद्र आव्हाड यांनी महिलेला हाताने बाजूला सारले होते. आव्हाड यांचे हे वर्तन आक्षेपार्ह वाटल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण प्रचंड तापले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *