महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । इडीने अटक केल्यानंतर शंभर दिवसांहून अधिक कोठडीत राहिलेल्या खासदार संजय राऊत यांना मागील आठवड्यात जामीन मिळाला. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे खासदार राऊत यांची भेट घेतली. मी नाशिकला लवकरच भेट देईन, असे सांगताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. (MP Sanjay Raut advice to Shiv Sainiks local bodies election Nashik news)
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते. चाळीस आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतरही नाशिकमध्ये या तोडफोडीची झळ बसली नाही. त्यामुळे खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
परंतु, यापुढे अशीच एकजूट कायम ठेवून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात मी लवकरच नाशिकमध्ये येईल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र पक्षाच्या भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिकमध्ये शिवसेना पक्षाचा विस्तार व शिवसैनिकांची एकजूट टिकून राहिली त्याला संघटन कौशल्य कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.