महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । राज्यात मोठे प्रकल्प येतील व तरुणांना रोजगारही मिळेल. त्याचसोबत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली जाईल. दर्जेदार शिक्षण, आरोग्य यासाठी प्रयत्न करून औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्राला आणखीन पुढे नेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
साम वाहिनीच्या सामर्थ्य महाराष्ट्राचे, वेध भविष्याचा, मंथन विकासाचे या कार्यक्रमात ते बोलत होते. दोन-तीन महिन्यात मोठे उद्योग राज्यात येतात जातात असे होत नाही, त्याची मोठी प्रक्रिया असते. उद्योग प्रकल्प इतर राज्यात जाऊ नयेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राज्यात मोठे उद्योग येतील असे पंतप्रधानांनीही आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांनाही सुखी ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यांना नियम डावलून निकषात बसत नव्हती तरीही अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिली आहे. परतीच्या पावसाच्या नुकसानीचेही पंचनामे करून कोणालाही नुकसानभरपाई पासून वंचित ठेवणार नाही असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राला आणखी विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी अनेक महामार्गाच्या मिसिंग लिंक चे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल, अपघात होणार नाहीत. समुद्राकडे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी आशियाई विकास बँकेने सहकार्य दिले आहे. मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मोठ्या कंपन्या येत असून लवकरच याची कार्यवाही सुरू होईल. मुंबईत सुशोभीकरणाचे स्पॉट देखील निश्चित करण्यात आले आहेत. चांगल्या आरोग्यासाठी अडीचशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाने उभारण्यात येतील. केंद्रानेही गेल्या आठवड्यात राज्यातील २२५प्रकल्पांना दोन लाख कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हानिहाय वैद्यकीय कॉलेजही उभारण्याचा निर्णय झाला आहे, असेही शिंदे म्हणाले.