महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एका विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच जामीन दिला आहे. यानंतर आता, त्यांनी कारागृहातील आपली आपबिती सांगितली आहे. कारागृहात आपल्याला ‘अंडा सेल’मध्ये ठेवण्यात आले होते. तेथे आपल्याला 15 दिवस ऊनही दिसले नाही. बराच वेळ जेलमधील फ्लडलाइट्सच्या संपर्कात राहिल्याने आता माझी दृष्टीही कमकुवत झाली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एढेच नाही, तर जेलमधील काळात आपले 10 किलो वजन कमी झाल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.
राऊत म्हणाले, ‘मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.‘
राऊत स्वतःला म्हणाले ‘युद्ध कैदी’ –
स्वतःला ‘युद्धबंदी’ म्हणत, राऊत यांनी दावा केला, की जर आपण त्यांच्यासमोर (BJP) आत्मसमर्पण केले असते अथवा ‘मूक दर्शक’ बनून बसलो असतो, तर आपल्याला अटक केली गेली नसती. मी स्वतःला युद्ध कैदी समजतो, सरकारला वाटते, की आम्ही त्यांच्यसोबत यूद्ध करत आहोत.
राऊत म्हणाले, आपण महाराष्ट्राचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात पाहिले. त्यांची प्रकृती ठीक नाही. सरकार केवळ विरोधी पक्षात असलेल्यांनाच कारागृहात टाकणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी आपण जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबामुळेच आहोत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावर दिली अशी प्रतिक्रिया –
संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांवर अशाप्रकारचे आरोप करणं आणि त्यांची बदनामी करणं हे महाराष्ट्राला अजिबात मंजूर नाही. शिवसेना काय तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही याचं समर्थन करणार नाहीत. राहुल गांधींनी असं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. भारत जोडो यात्रा देशातील हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी या महत्वाच्या प्रश्नांच्या विरोधात निघाली आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मग अशावेळी वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.