महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्यानंतर आणि राज्यभारत त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची आज संध्याकाळी शेगावमध्ये सभा झाली. यासभेत राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख टाळत एक प्रकारे वादावर पडदा टाकला आहे. सावरकरांवरील वक्तव्याच्या वादामुळे राहुल गांधींच्या सभेच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
इंग्रजांना लिहलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे राहुल गांधी यांनी सादर करत सावरकरांवर टीका केली होती. माफीनाम्यातील शेवटची ओळ राहुल गांधी यांनी वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी माफीनाम्यात म्हटल्याचे राहुल गांधी बोलले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राज्यात गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी जोरदार निदर्शनं झाली. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासह मनसेनेही आक्रमक भूमिका घेत आंदोलनं केली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची आज शेगावमध्ये सभा झाली. सावरकरांबाबत केलेले वक्तव्य निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज आपल्या सभेतील भाषण थोडक्यात आटोपते घेतल्याचे दिसून आले. तसंच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सावरकरांचा उल्लेख टाळला. भाषण कुठेही राहुल गांधी सावरकर आणि राज्यात उमटलेल्या तीव्र पडसादांबाबत बोलले नाही. राहुल गांधी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि उद्योगांच्या मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
देशातील कानाकोपऱ्यात आज भाजपने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. जिथे कुठे जाल तुम्हाला भीती, द्वेष आणि हिंसेचं चित्र दिसेल. या भीती, द्वेष आणि हिंसेविरोधात आम्ही ही यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा उद्देश हा जनतेचा आवाज ऐकणं, तुमच्यातील भीती समजून घेण्याचा आहे. भीती दाखवून, हिंसा आणि द्वेष पसरवून फूट पाडली जाते. पण प्रेमाने जनतेचा आवाज ऐकल्याने लोक एकजुट होतात. द्वेषाच्या विषातून या देशाचे कधीच कल्याण होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
भीती कोणाला, कोण घाबरलं आहे? असा प्रश्न विरोधक विचारतील. पण विरोधक आणि प्रश्न विचारणारे पाच मिनिटं रस्त्यावर चालले असते तर त्यांना ही भीती काय आहे, हे समजलं असतं. गेल्या सहा महिन्यांत या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. का केल्या शेतकऱ्यांनी आहत्महत्या, काय होतं कारण? कुठल्याही शेतकऱ्यांशी बोला. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, असं शेतकरी सांगत असल्याचं राहुल गांधी बोलले. आम्ही विम्याचे पैसे भरले. पावसामुळे नुकसान झाले. पण एक रुपयाही मदत मिळली नाही, असं शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यावर ५० हजार आणि एक लाखाचं कर्ज असतं. काही हजारांचं कर्ज असतं तरीही आमचं कर्ज माफ होत नाही. पण देशातील अब्जाधीश उद्योगपतींचं कोट्यावधींचं कर्ज माफ होतं, असं का? असा सवाल शेतकरी करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. ही भीती नाहीए तर काय आहे? असं ते पुढे बोलले. केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना यापूर्वीही शेतकऱ्यांनी आत्महत्या केला. त्यावेळी आम्ही विदर्भातील शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केले, असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधानांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खुल्या दिलाने आणि प्रेमाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर इथे एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही. मन मोकळंपणे ऐकलं तर शेतकऱ्यांचं दुःख आणि वेदना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री समजू शकतील. आणि त्यांना शेतकऱ्यांचं दुःख लक्षात आलं तर ते नक्कीच त्यांना काहीना काही मदत करतील, असं राहुल गांधी पुढे म्हणाले.
भारत जोडो यात्रेत रस्त्यांवर फक्त शेतकरीच नाही तर तरुणही आहेत. हजारो तरुणांशी मी बोललो. कुणाला इंजिनीअर व्हायचं, कोणाला सरकारी नोकरी हवी आहे. प्रत्येक तरुणाच्या आई-वडिलांनी त्यांना मोठं करण्यासाठी आपल्या कष्टाची कमाई लावली आहे. विद्यापीठात आणि महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवतात. हे शिक्षण मोफत मिळत नाही. लाखो रुपये मोजावे लागतात. पण इंजिनीअर झालेल्या तरुण मजुरी करतोय, उबरची कार चावलतोय. आपल्याला असा भारत हवा आहे का? असा सवाल राहुल गांधींनी केला. मुलांना शिकवून मोठं करून पालक लाखो रुपये खर्च करतात. हा पैसा उद्योगपतींच्या खिशात जातोय. यामुळे तरुणांचं स्वप्न पूर्ण होत नाहीए. असा भारत आम्हाला नकोय, असं राहुल म्हणाले.
दोन-तीन उद्योगपती देशाच्या तिजोरीवरच डल्ला मारत आहेत. आणि आपले तरुण रोजगारासाठी भटकत आहेत, असं भारत आम्हाला नकोय. आम्ही असं होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या आणि त्यांच्या आई-वडिलांच्या मनात भीती निर्माण करून ही भीती भाजप द्वेषात रुपांतरीत करत आहे. फूट पाडण्याचं काम करत आहे. भावाला-भावाविरोधात लढवत आहे. सर्वांना भाऊ, आई-वडील आहेत. कुटुंबात द्वेष निर्माण झाल्यास कुटुंबाचा फायदा होतो की नुकसान? असा सवाल राहुल गांधींनी केला. कुटुंबाला फायदा होत नाही तर देशाला कसा होणार? देशही एक कुटुंबच आहे. म्हणून द्वेषाने कुणालाच फायदा होत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
ही महापुरुषांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, होळकर, संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर, शिर्डी साईबाबांची ही पुण्य भूमी आहे. यापैकी कुणीच द्वेष आणि हिंसा पसरवण्यास सांगितलं नाही. सर्वांनी प्रेम आणि अहिंसेचा संदेश दिला. सर्वांना नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. हाच या यात्रेचा उद्देश आहे. आम्ही जोडण्याचं काम करतो, ते तोडण्याचं आणि द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत, असं राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला.