सोनं-चांदीसोबत या गोष्टी महागणार, सरकारच्या ‘या’ निर्णयाचा होणार परिणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । महागाईतून थोडा दिलासा मिळत असतानाच पुन्हा खिशाचा भार वाढवणारी बातमी आली आहे. भारतीय बाजारात पामतेल आणि सोन्या-चांदीच्या किमती लवकरच वाढू शकतात.

जागतिक बाजारपेठेत सतत वाढत असलेल्या किमती लक्षात घेऊन सरकारने सोने, चांदी आणि पाम तेलाच्या बेस इम्पोर्ट किमतीत वाढ केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातील त्यांच्या किमतींवरही परिणाम दिसून येईल. सरकारच्या प्रयत्नांमुळे काही काळ खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

वृत्तसंस्था रॉयटर्सने असं वृत्त दिलंय की जागतिक बाजारपेठेत किंमती वाढल्याचा दबाव सरकारवर होता आणि त्यामुळेच सोने आणि चांदी व्यतिरिक्त, सरकारने रिफाइंड पाम तेल आणि आरबीडी पाम तेल या दोन्हींच्या बेस इम्पोर्ट किंमतीत वाढ केली आहे.

कच्च्या पाम तेलाची बेस इम्पोर्ट किंमत आत्तापर्यंत 952 डॉलर होती, जी आता 960 डॉलर प्रतिटन झाली आहे. त्याचप्रमाणे, आरबीडी पाम तेलाची बेस इम्पोर्ट किंमत देखील 962 डॉलरवरून 988 डॉलर प्रतिटन करण्यात आली आहे.

आरबीडी पामोलिनची बेस इम्पोर्ट किंमत आतापर्यंत 971 डॉलर प्रतिटन होती, सरकारने तीदेखील 1,008 डॉलर्सपर्यंत वाढवली आहे. सरकारने कच्च्या सोया तेलाच्या बेस इम्पोर्ट किंमतीतही वाढ केली आहे. आत्तापर्यंत ही किंमत 1,345 डॉलर्स प्रतिटन होती, ती आता 1,354 प्रतिटन झाली आहे.

सरकारने पामतेलाबरोबरच सोनं आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट किंमतीतही वाढ केली आहे. सोन्याची बेस इम्पोर्ट किंमत 531 डॉलर प्रति 10 ग्रॅमवरून 570 डॉलर प्रति 10 ग्रॅम इतकी वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, चांदीची बेस इम्पोर्ट किंमत 72 डॉलर्सने वाढवली आहे, जी आता 702 डॉलर्स प्रति किलो झाली आहे. ही किंमत आतापर्यंत प्रति किलो 630 डॉलर होती.

जागतिक बाजारपेठेत पामतेल आणि सोन्या-चांदीच्या किमतींत वाढ झाल्यास भारतीय आयातदारांवरही दबाव वाढतो. देशांतर्गत बाजारातील किमती जागतिक बाजाराशी सुसंगत ठेवण्यासाठी सरकार दर पंधरवड्याला बेस इम्पोर्ट प्राइज म्हणजे आधारभूत आयात किमतीचा आढावा घेते.

बेस इम्पोर्ट प्राइज ही किंमत आहे, ज्याच्या आधारे सरकार व्यापार्‍यांकडून आयात शुल्क आणि टॅक्स आकारते. सोन्याच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा आयात करणारा देश आहे, तर चांदीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताची खाद्यतेलाची 60 टक्क्यांहून अधिक गरजही आयातीतूनच भागवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *