महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । देशाला हादरवून देणाऱ्या श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच आफताब पूनावाला याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील देशभरातून होत आहे.
या दरम्यान, शुक्रवारी साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला १५ दिवसांत आफताबची नार्को टेस्ट करण्याचे आदेश दिले. खरं तर, जेव्हा आरोपीची नार्को टेस्ट केली जाते, तेव्हा त्याची संमतीही आवश्यक असते. आफताबला जेव्हा कोर्टात विचारण्यात आले की, तो नार्को टेस्ट करायला तयार आहे का? तेव्हा त्याने संमती दिली होती. दरम्यान, आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करु नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आफताब अमीन पूनावाला याच्यावर कोणत्याही थर्ड डिग्री उपायांचा वापर न करण्याचे दिल्ली न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत.