महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टाकडे परवानगी मागण्यात आली आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनी साखर कारखाने विकत घेताना संशयास्पद व्यवहार केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने केलेल्या चौकशीनंतर पवार कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांकडून संशयास्पद लिलावाद्वारे कारखाने खरेदी करण्यात आले आहेत का, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास केला जाणार आहे. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना तसंच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोर्टाने परवानगी दिल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पवार काका-पुतण्याचीही चौकशी होऊ शकते.
दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबरच अनेक राजकीय नेत्यांसह एकूण ७५ जणांना दोन वर्षांपूर्वी ‘क्लीन चीट’ देणाऱ्या मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेत बदल झाला आहे. आरोपांबाबत फेरतपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती इओडब्ल्यूतर्फे काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली होती.